वेटिंग रुम
माणूस जगण्यासाठी किती हौसी आणि उतावीळ असतो हे बघायचंच असेल तर हॉस्पिटलमधल्या वेटिंग रूमला भेट द्या ...
निव्वळ आशेवर जगणारे जेवढे तेवढेच चिंतेत तीळ तीळ मरणारे सुध्दा इथेच ...
शारिरिक व्याधीवर शस्त्रक्रिया होते आणि मानसिक आजारांवर उपचार .....
इथे आल्यावर डोंगरदऱ्यातल्या मोकळ्या हवेतल्या स्वच्छंदी जीवनाची जाणीव होते आणि उणीव ही भासते ...
सगळं असताना हातपाय गाळून रटाळ जगणारे महाभाग आणि काहीच नसताना जगण्यालाही भूरळ पडावी असे तपस्वी ...
कित्येक असंख्य विचारांत गुंतलेली शांतता आणि अव्यक्त भावनांचा भरगच्च गोंधळ ....
ईसीजीच्या ग्राफ प्रमाणे जगण्याची कला साधणारी हृदयातील स्पंदनं,
एक्सरे वरील इमेज सारखे तर्क ज्याना बघण्यासाठी प्रकाशच लागतो ...
वेटिंग सुसह्य व्हावं म्हणून कोपऱ्यात रचलेले मॅगझीन्स ,
आणि .....
मरणाला सुद्धा नाराज न करता सगळे नियम तोडून हसत हसत एक्झिट घेणारे जिगरबाज दानशूर ....
जिवंतपणाचा हा क्षण अनुभवण्यासाठी वेटिंग रूम कायम जागी असते ..... कशाची तरी वाट पाहात . ...


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा