को.वि. ड.
रुटीन लोकांच थोडं सेट होत होतं. कारखाने आणि व्यवसाय उभारी घेऊ लागले होते. थिएटरवर सिनेमे सुध्दा झळकू लागले. हवामान बदलामुळे खोकला यायला लागला म्हणून थोडा आराम करावा म्हटलं .....
तर अचानक कोशलराव विनायक डमढेरे ( को. वि. ड. ) भेटले. बरेच दिवस न्यूज मध्ये असल्याने त्यांना असं अचानक येण्याचं कारण. विचारलं.पहिल्यासारखंच आपलं त्याच ..
" मी न सांगताच येतो " - कोविडराव म्हणाले
" अरे पण उगाचच न बोलावता यायला तुला काहीच वाटत नाही का ?
तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम्स झाले ? कितीतरी लोकांचे व्यवसाय बुडाले. अरे किती त्रास झाला लोकांना. सगळयांच्या नाकी नऊ आणलंस. पण आता तुला ह्ददपार करायला लस आणलीय. तूला जावंच लागेल आता "- मी
कोविडराव पण वैतागून म्हणाले " काय राव असं ..... चोराच्या उलटया बोंबा. मला तरी कुठं हौस आहे इथे राहायची ?
चांगला आफ्रिकेत सेटल होतो. वटवाघळांच्यात आणि प्राण्यांबरोबर मस्त लाईफ चाललं होतं . तुमीच मला उचलून आणलं आणि मी पूर्ण अडकलो ".
मी - " अरे .... पण तू तरी का फैलावलास एवढा. तुला सांगू का. आपल्यापेक्षा कुंटूबाची जास्त काळजी असते सगळयांना आणि तू कुटुंबालाच त्रास दिलास.
अरे माणसाला माणसापासून दूर केलस. त्याला उपाशी राहायला भाग पाडलेस. दवाखाने आणि त्यांचे बेड पण अपुरे पडले तुला. गरीब बिचाऱ्या लोकांची रोजीरोटी पण बंद केलीस तू ,"
कोविडराव -" एक्स्कूज मी .... सगळे आरोप मान्य नाहीत मला. माझ्या अशा त्रासदायक असण्यात माझा काय दोष ? पण तुम्ही लोक तर शहाणे आहात ना , मग तुम्ही का असे वागता ?
ऑलरेडी मुळ जीवनाशी नाळ तोडलेले तुम्ही. गावाकडची टोलेजंग ईमारत , मस्त जमिन आणि मोकळी हवा सोडून शहरात गुंठा भराच्या बंदिस्त फलॅट मध्ये न्यूट्रल फॅमिली म्हणून जगायला लागलात. कायम घाई आणि स्पर्धा..... शुगर आणि बीपी सारखे त्रास तर कॉमनच म्हणावे लागतील. ईथपर्यंत पण ठीक होतं. पण खाण्यापिण्याच तारतम्य पण सोडलं. निसर्गानं एवढं संपन्न सगळ दिल असताना खाण्यापिण्यात तुमच्यातला जनावर जागा कसा झाला ? ...
माणसांपासून मी माणसांना दूर केलंय म्हणता पण तुम्ही तरी असे किती कनेक्टेड असायचात एकमेकांशी ..... जगण्याच्या घाईगडबडीत तुम्ही नाती आणि आयुष्य विसरलात. एकांतात राहिलात तेव्हा तुम्हाला माणसांची , नात्यांची आणि आरोग्याची किंमत कळू लागली. तुमची नाळ ज्या ग्रामीण जीवनाशी जोडली तिथे तुम्ही स्थिरावू लागलात.
तुम्ही जगताना निसर्गाचे काय नियम पाळले? एवढा त्रास होत असताना देखील सर्रास गर्दी , भरगच्च संभारंभ आणि हाऊसफुल्ल पर्यटनस्थळं ते सुद्धा विदाऊट मास्क .....
याचा परिणाम काय होणार होता ? हे माहित असूनही तुम्ही असे वागलात, वागताय ..... मग मी अजून अडकत गेलो इथे ......
मी असाच आहे .मला निसर्गाने असंच बनवलंय .
अरे पण तुम्ही ?
नक्की चूक कोणाची ?"
क्षणभर मी सुन्न झालो . कोविडराव बरोबर बोलत होते.
मी -" हं ...........
आता आलाच आहात तर तुमचा १४ दिवसांचा पाहुणचार करावाच लागेल. तुम्ही फ्रेश व्हा. भरपूर गप्पागोष्टी होतील आता ....."
मी बोलेपर्यंत कोविडराव फ्रेश होऊन शेजारच्या आरामखुर्चीवर निवांत बसले होते .........
हातातलं १४ दिवसांनंतर चं रिटर्न टिकेट न्याहाळत .......


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा