बळीराजाची गोष्ट

 

आज महाराष्ट्र कृषी दिन ...

मी ज्या मातीत घडलो त्या ग्रामीण भागातल्या माझ्या बळीराजाला आभिवादन करून त्याची खरी परिस्थिती सांगणारी एक गोष्ट आवर्जून लिहितोय ....

  काल्पनिक असली तरी तिच्या मागची वेदना अस्सल आहे ....

बघा जाणवली तर ...🙏🏻🙏🏻

 चटका देणाऱ्या उन्हाची धग ....

बाजारात कोपऱ्यावरच्या दगडावरचे कापडी चटके ....

कोरडा घसा आणि रिकामं पोट ....

दगडू कांदे घेऊन चार तास बसला होता पण अजून माल तसाच. जसजसा सुर्य वर येऊ लागला तसतसं उपाशी दगडूला रात्रीच्या भुकेची काळजी वाटू लागली .....

ईतक्यात एक कार कडेला थांबली. एक मध्यमवर्गीय जोडपं कांद्याची विचारपूस करु लागलं ...

महिला - कसे दिले रे कांदे ?

दगडू - २० रुपये किलो ताई . 

महिला - बापरे काय महागाई झालीय. नीट सांग रे .५ किलो घ्यायचेत.

दगडू - ताई माल बघा तुमी . एकदम ताजा . कांदाबी मोठा हाय .

महिला - तेवढं कळतं मला . १५ रु किलो दे .

दगडू विचार करू लागला. बापाची औषधं , पोराची शाळेची फी आणि कालपासून थंड पडलेली चूल त्याच्या डोळयासमोर येऊ लागली . 

माहिला - देतोय का बघ . नाहीतर पुढून घेते .

दगडू - थांबा ताई . १७ तरी द्या. घ्या मी भरतो .

माहिला - १५ फिक्स ... जमतंय का ?

दगडू ( खालच्या स्वरात ) - बरं ताई ... बोहनी तरी होईल .

बिस्लेरीचे दोन घोट पित त्या जोडप्यातील गृहस्थानं कांदे चाळायला सुरुवात केली . 

गृहस्थ - अरे रे रे .... काय रे हे ... सगळा सडका माल विकतो का ? 

दगडू - नाय वं सायेब ... ते कपडयाचा कलर लागलाय .  ... माल एक नंबर हाय सायेब ...

गृहस्थ - ठीके .... एक काम कर दहा ने दे ... काय गॅरंटी तुझ्या मालाची ... जमतंय का बघ नाही तर राहू दे 

दगडू - सायेब , असं काय करता ... अवं कर्जाचं व्याज बी नाय निघायच आमच एवढयात ...

गृहस्थ - दहा ने दे नाही तर सोड ...

  दगडूच्या घशाची कोरड अजूनच वाढली . घामाचा शिडकाव जोरावला . पोटाची खळगी डोळ्यात उतरू लागली . बायकापोरं आणि आईबापाची अर्धवट भूक डोक्यात घर करू लागली. 

शांतपणे दगडू कांदे भरू लागला ...

ग्रहस्थ - बरं एक काम कर . अजून एक किलो घेतो. ५ ने दे चल ...

  दगडू तसाच स्तब्ध थांबला . त्याचे हात थरथरू लागले . शेतात गाळलेला घाम रकत बनून पूर्ण शरीरात वाहू लागला . लागणाऱ्या चटक्यांनी तो लाल झाला . सगळा संयम पोटाच्या खळगी पुढे अपुरा ठरला . डोळ्यात पाणी आणणारा कांदा त्याच्या डोळ्यात रक्त गोळा करु लागला. 

दगडू ओरडला - एक काम करा . फुकटच घेऊन टाका. कशाला ५ तरी देताय .

गृहस्य - फुकटच ध्यायला पाहिजे असला सडका माल ...

 आता दगडूचा संयम पूर्ण सुटला . कसंतरी उभं राहून तो बोलू लागला ....

 दगडू - चल उठ हितून ...

   नाय ईकायचा मला कांदा ... गरिबाची किती चेष्टा करायची तुमच्यासारख्या बेशरम लोकांना नाही कळणार ...

 दगडू बेफामपणे कांदे उधळू लागला ... त्यावर नाचू लागला . त्याचे डोळे पूर्ण ओले होते. ते कांद्याने डोळ्यात आणलेलं पाणी मात्र माझ्या जीवाला चटका देऊन गेलं ....

टिप्पण्या

  1. खर आहे...काही जण अशीच रक्कमेसाठी घासाघीस करतात. मी गेली अनेक वर्ष पुस्तक विक्री करतो..छापील किंमत असून तिथे पण घासाघीस करतात..आणि इथे तर बिचारे शेतकरी दिवस रात्र मेहनत करून पिकवतात. हे असे लोक मॉल मध्ये जाऊन वारेमाप पैसा खर्च करतील. पण इथी त्या गरीब माणसाची ते अडवणूक करतील..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट